menu

Friday, April 14, 2017

रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील

रयत शिक्षण संस्थेची सक्षम माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील
कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्‍या सामाजिक कार्यात त्‍यांच्‍या पत्‍नी लक्ष्‍मीबाई यांचेही योगदान अत्‍यंत मोलाचे आहे. म. जोतीराव फुले यांना सावित्रीमाई फुले यांनी जशी साथ दिली, त्‍यांच्‍या कार्यांत हातभार लावला त्‍याचप्रमाणे लक्ष्‍मीबाई यांनी केलेले कार्य त्‍याच तोलामोलाचे आहे.
लक्ष्‍मीबाई यांचा जन्‍म ७ जून १८९४ रोजी कुंभोज, जि. कोल्‍हापूर येथे झाला. त्‍यांच्‍या वडिलांचे नाव अण्‍णा पाटील होते. कर्मवीर भाऊरावांचा जन्‍मही याच गावी त्‍यांच्‍या आजोळी झाला. कुंभोज हे समृध्‍द गाव होते. गावातील जैन समाज मात्र पारंपारिक कर्मठ होता. त्‍यामुळे लक्ष्‍मीबाईच्‍या मनावर कर्मठपणाचे संस्‍कार बालपणापासूनच द्दढ झालेले होते. लक्ष्‍मीबाई व भाऊरावांचे लग्‍न सन १९०९ मध्‍ये कुंभोज येथे झाले.
किर्लोस्‍करवाडीला  भाऊरावांकडे  दहा  बारा  माणसांचे  एकत्र  कुटुंब होते.  या  सर्व कुटुंबाचे  काम  लक्ष्मीबाई  स्‍वतः करीत.  याशिवाय घरी येणारे जाणारे  पाहुणे  यांचेही आदरतिथ्‍य त्याच  करीत. त्‍यामुळेच  किर्लोस्‍कर  कारखान्‍याचे   मालक  लक्ष्‍मणराव  किर्लोस्कर  नेहमी  म्हणत असत , "गृहलक्ष्‍मी  असावी तर लक्ष्मीबाई पाटील यांच्‍यासारखी भाऊरावाच्‍या आई गंगाबार्इ यांच्या  मुशीतून लक्ष्मीबाई  जडणघडण झाली होती.
किर्लोस्कावाडीला राहत असताना  लक्ष्मीबाईचा कर्मठपणा नैसर्गीकरित्‍या  अठरा पगडा  जातीच्या बायकांमुळे  कमी  झाला. याचा काळात  भाऊरांव सत्यशोधक  समाजाचे  कार्य करीत असल्यामुळे  सर्व  जाती- धर्मांचे लोक त्यांच्याकडे  येत असत. त्यामुळे लक्ष्मीबाईना  सोवळे ओवळे कठीण जाऊ लागले व हळूहळू त्यांची कर्मठपणाची मानसिकता कमी होऊ  लागली. या  काळातच  त्यांना १९१७  मध्‍ये आप्पासाहेब व १९१९  मध्‍ये शंकुतला  अशी दोन अपत्ये झाली.
करवीर नगरीत सत्यशोधक  समाजाचे  आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी आपल्या  संस्थानात प्रजेचा कायापालट घडवून आणण्‍यासाठी सत्यशोधक  चळवळीच्या विचाराचे लोक खेडोपाडी पसरवले होते. कर्मवीर  अण्णा तर  राजर्षी  शाहू  महाराजांच्या तालमीतच तयार झाले होते त्यांनी सातारा या क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात  सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार केला. सत्यशोधक  समाजाच्या विचाराने भारावलेली  एक पिढी त्यांनी  घडविली. जेव्हा  सातारा जिल्ह्यात सत्यशोधक  समाजाने  लोक  जागृतीसाठी  जलसे काढले  तेव्हा भाऊरावांनी डफ वाजवण्यासाठी  मागेपुढेही  पाहिले नाही. सन १९१९ साली सातारा जिल्ह्यातील काले नावाच्या एका खेडयात सत्यशोधक समाजाचे अधि‍वेशन  घेतले होते. या अधिवेशनाच्या विचारपीठावर  कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी  एक खास  संस्था   काढण्याची  कल्पना  मांडली आणि ठराव  रुपाने त्या अधिवेशनात त्यास  मान्यता मिळाली.  अशा रितीने रयत शिक्षण  संस्थेचे बीज सत्यशोधक  समाजाच्या विचारपीठावर रोवले गेले.  वृक्षाखाली  गौतम  बुध्‍दांना  ज्ञान  प्राप्त झाले.  बहुजन  हिताय ! बहुजन  सुखाय !! हे गौतम  बुध्‍दांचे संदेश आहे म्हणून  संस्थचे बोधि‍चिन्ह वटवृक्ष आहे.
१९१९  मध्ये  रयत  शिक्षण संस्थेची  स्‍थापना  काले,   जिल्हा  सातारा  येथे करुन  भाऊरावांनी तळागाळातील  बहुजन समाजाला  शिक्षणाची  संधी करुन  दिली . सर्वप्रथम  एक वसतिगृह काढून  त्यातं सर्व जातीधर्माच्या  मुलांना प्रवेश दिला. सन १९२४ मध्ये  सातारा येथे जिल्ह्याच्या ठिकाणी  संस्थेचे स्थलांतर  करण्यात आले. सोमवार पेठेत स्वत :च्या राहत्या घरीच मोहिते नावाच्या दलित विदयार्थ्याला  ठेवून  वसतिगृह सुरु केले . परंतु हा मुलगा जास्त दिवस राहिला नाही.  त्यानंतर  पहिल्यावर्षी  चार  मुले वस्तीगृहात  दाखल झाली. वसतिगृह घरातच असल्यामुळे  सर्व मुलांचा स्वयंपाक लक्ष्मीबाईना करावा  लागे.
सन १९२६ मध्ये लक्ष्मीबाईना बेबी हे तिसरे अपत्य झाले . बेबी ही वसतिगृहात जात येत असे. वसतिगृहातील मुले स्वयंपाक हाताने करत असत  मुलांनी  भाकरी  केली की बेबी  खाण्यासाठी  जात  असे. भाकरी  खात खात घरी गेली की  भाकरी लक्ष्मीबाईच्या भाकरीच्या टोपलीत टाकी. त्यावेळी  त्या तिला रागावत असत. पण बेबीवर त्याचा काहीही परिणाम होत नसे. तेव्हा त्यांना सोवळे पाळणे  कठीण  जाऊ  लागले हळूहळू त्यांच्या स्वभावामध्ये बदल होऊ लागला व त्या वसगिृहातील मुलांशी एकरुप झाल्या.
२५ फ्रेबुवारी १९२७ रोजी वसतिगृहाला म. गांधीजीच्या हस्ते श्री  छत्रपती शाहू  बोर्डिंग हाऊस’  नाव देण्यात  आले. त्याच वर्षी  धनीणीची  बाग  बोर्डिंगसाठी खंडाने घेण्यात आली. भाऊराव  महिन्यातील पंधरा- वीस दिवस बोर्डिंगच्या व इतर सार्वजनिक कामासाठी  फिरतीवर जायचे अशा वेळी  बोर्डिंगची सर्व जबाबदारी  लक्ष्मीबाईवर येऊन पडत असे. तेव्हा त्या वसतिगृहातील प्रौढ मुलांच्या सहकार्याने संपूर्ण  वसतिगृहाची देखरेख करीत असत . बोर्डिंगमधील भोजन व शेती  संबधी सर्व कामावर लक्ष ठेवीत. मुलांचा स्वयंपाक वेळेवर व्हावा  विद्यार्थ्यांनी जेवण करुन आपापल्या शाळेत वेळेवर जावे याची त्या दक्षता घेत . त्याखेरीज बाजारहाट  शेतीला पाणी  देणे मालविक्री  यावरही  लक्ष  ठेवीत असत. मुलांचे जेवण  झाल्यावरच त्या स्वत:चे जेवण घेत.
एकदा  लक्ष्मीबाईची दाढ खूप दुखत होती सातारा  येथील  औषधोपचारने बरे न वाटल्यामुळे भाऊरावांनी त्यांना ओळखीच्या डॉक्टरांकडे पुण्याला पाठविले. त्यांच्याबरोबर आप्पालाल शेख या वसतिगृहातील  विद्यार्थ्यांबरोबर थोडा शिधा  दिलीते दोघे  बादल नावाच्या वसतिगृहातील माजी विद्यार्थ्याच्या  घरी  थांबले. लक्ष्मीबाईना दाढदुखाचा त्रास जास्त होत असल्यामुळे त्यांना स्वत: स्वयंपाक करता येत नव्हता व त्या सोवळे पाळत  असल्यामुळे खाणावळीत किंवा हॉटेलमध्ये जेवण घेणे त्यांना  अशक्य होते. तेव्हा शेख या विद्याथ्याने  त्यांना पिठल भात करुन खाऊ घातला तो त्यांनी आनंदाने  खाल्ला. कुणाच्या हातचे अन्न न खाणा‍र्‍या लक्ष्मीबाईनी एका मुस्लिम  विद्यार्थ्याच्या हात जेवण खाल्ले. त्यामुळे  त्यांचे सोवळे पार गळून पडले. त्या वसतिगृहाकडे जातीने  लक्ष  देऊ  लागल्या. वसतिगृह पाहण्यासाठी बाहेरचे पाहूणे  आल्यास ,त्यांना संपू्र्ण वसतिगृहाची माहिती देऊ  लागल्या. जर पाहुण्यांनी त्यांना विचारले, तुम्हाला मुले  किती ? मला पन्नास  मुले आहेत . अशा त्या सांगू लागल्या. वसतिगृहातील मुले व स्वत:ची मुले यांच्यात त्या फरक मानत नसत वसतिगृहातील मुलांच्या त्या  माता  बनल्या होत्या वसतिगृह हेच एक त्यांचे कुटुंब झाल्यामुळे व्यक्तिगत  कौटुंबिक जीवन त्यांना राहिले नव्हते.
सन १९३० च्या मकर संक्रातीच्या सणाच्या वेळी वसतिगृहात फारच  बिकट परिस्थ्‍िाती निर्माण झाली.  वसतिगृहातील  सर्व  धान्य संपले होते. पैसाही  शिल्लक  नव्हता. पूर्वीची उधारी  राहिल्यामुळे  व्यापारी उधार  धान्य  देण्यास तयार नव्हता. भाऊराव  देणग्या जमा  करण्यासाठी बाहेरगावी  गेले होते. वसतिगृहातील सेक्रेटरीने  लक्ष्मीबाईना ही हकिगत  सांगितली . अशा वेळी काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. आतापर्यंत वसतिगृहाच्या  अडीअडचणीला लक्ष्मीबाईच्या अंगावरील जवळपास ६०  तोळ्यांचे  सोन्याचे दागिने  विकले गेले हाते. आता  विकण्यासाठी  काहीही शिल्लक  नव्हते  त्याच  वेळी त्यांचे लक्ष गळ्यातील मंगळसूत्राकडे  गेले . क्षणभर मनाची घालमेल झाली . लगेच आपल्या  सौभाग्याचे लेणें असलेले मंगळसूत्र काढून  त्याला ते  गहाण ठेवुन  पैसे आणण्यास  सांगितले अशा  प्रकारे  वसतिगृहातील मुलांची खाण्यापिण्याची  अडचण त्यांनी दुर  केली ते गहाण ठेवलेले मंगळसूत्र नंतर  सोडविता न आल्यामुळे  विकून टाकावे लागले.
लक्ष्मीबाईनी रयत शिक्षण  संस्थेच्या   जडणघडणीत  तनमनधन  अर्पण केले.  म्हणून  त्यांच्या परिसस्पर्शाने  रयत शिक्षण  संस्थेचे सोने झाले.इ . स . १९३० साली  लक्ष्मीबाईचे  निधन  झाले पण  त्यांनी  मरणोत्तर  आपली व्यक्त केलेली इच्छा   म्हणजे  बोर्डींगमध्ये  सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश  असावा  व दुसऱ्या   दिवशी पाडव्याचे जेवण सर्वांनी घ्यावे . या  त्यांच्या विचारावरुन  त्यांच्यातील  दूरदृष्टी व समाजहिताची सदोदीत घेतलेली काळजी याची ग्‍वाही पटते. लक्ष्‍मीबाईंचा आदर्श व कृती ही भारतीय स्त्रिायांना आजही प्रेरणा देणारी घटना आहे. त्‍याची आठवण म्‍हणून पुढे सौ. लक्ष्‍मीबाई पाटील  मेमोरिअल  एज्युकेशन  फंड  हा उपक्रम  सुरु  करण्यात  आला. आज  या फंडातून  गरीब होतकरु आणि गरजू विद्यार्थांना  कर्जरुपाने  शिक्षणासाठी  अर्थसहाय्य करण्यात  येते.  याचा  फायदा हजारो विद्यार्थी आज घेत आहेत.
अण्णा आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई  यांनी  विद्यार्थ्यावर स्वत:च्या  मुलाप्रमाणे  प्रेम  केले. श्रीमंत  जैन  घराण्यातून  आलेल्या लक्ष्मीबाईनी आपले साठ (६०) तोळ्याचे दागिने  गरीब  अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या  पालनपोषणासाठी  खर्च केले. मी चालले . या मुलांना  सोडून  कुठेही जाऊ नका  उद्या  पाडव्याचा  सण आहे मी गेले तरी सर्वांना  जेऊ  घाला  आणि  बोर्डिंगचे  हे रोपटे मरु देऊ नका हे त्यांनी सन १९३० मध्ये मरण्यापूर्वी  काढलेले अखेरचे शब्द होते.
सन १९४८ मध्ये एका समारंभात  भाऊराव  म्हणाले  होते. मी सर्वाच ऋण फेडीत  आलो परंतु माझ्या पत्नीचे  ऋण मला  आजतागायत  फेडीत  आलेले नाही. खरोखरच लक्ष्मीबाईनी  जो त्याग  केला  जे समर्पण  केले त्याचे ऋण  कर्मवीर  डॉ. भाऊरावांप्रमाणेच  कोणत्याही भारतीय व्यक्तीला  फेडता  येणार नाही.  

7 comments:

  1. महत्त्वाची माहिती सर

    ReplyDelete
  2. But I have त्याग रयत माउलीचा speech

    ReplyDelete
  3. आपण सर्वजन माऊलीच्या ऋणातच आहोत
    त्यागाची ही प्रेरणा आपणही पूढे सुरु ठेवूया

    ReplyDelete